NEP Maharashtra 2025 अंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून शाळांमध्ये आमूलाग्र सुधारणा करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धेसाठी तयार करण्याच्या उद्देशाने, अभ्यासक्रम, शिक्षक व्यवस्थापन, परीक्षा प्रणाली आणि शाळांमधील मूलभूत सुविधांमध्ये सकारात्मक बदल घडवले जात आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2025 अंतर्गत आता विशेषतः, हिंदी भाषा ऐच्छिक करण्यात आली आहे. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ गीताचा शाळांमधील समावेश, आणि ‘सीएम श्री’ आदर्श शाळा व ‘आनंद गुरुकुल’ यांसारख्या नविन उपक्रमांची अंमलबजावणी या निर्णयांकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी याबाबत माहिती देत, शिक्षण क्षेत्र अधिक प्रभावी, सर्वसमावेशक आणि विद्यार्थीकेंद्रित करण्याच्या दिशेने शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
Table of Contents
NEP Maharashtra 2025 | National Education Policy
राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रात व्यापक आणि परिणामकारक सुधारणा घडवून आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. याबाबतची माहिती देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री श्री.भुसे यांनी मंत्रालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, एससीईआरटी चे संचालक राहुल रेखावार उपस्थित होते.
हिंदी भाषा आता ऐच्छिक – विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेचा पर्याय
राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यात राज्यातील विद्यार्थी उद्याच्या स्पर्धेत कुठेही कमी पडू नयेत याचीही दक्षता घेतली जात आहे. सर्व शाळांमध्ये मराठी विषय बंधनकारक असून इंग्रजी भाषा शिकविण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.
आता नवीन धोरण राबविताना सुकाणू समितीने घेतलेल्या निर्णयानुसार पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा विषय अनिवार्य करण्यात आला होता. तथापि हिंदी भाषा विषय ऐच्छिक ठेवण्याबाबतचा सुधारित शासन निर्णय काढला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले आहे.
‘गर्जा महाराष्ट्र माझा’ शाळांमध्ये सन्मानाने गायले जाणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात, ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर सन्मानपूर्वक गायले जाणार आहे. याशिवाय शाळांमध्ये स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे, प्रयोगशाळा, वाचनालय, खेळाचे मैदान यांसारख्या भौतिक सुविधा सुधारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
कॉपीमुक्त परीक्षा व गुणवत्तेच्या दिशेने मोठे पाऊल
राज्य सरकारने दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त ठेवण्यासाठी विशेष अभियान राबवले असून, याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यापुढे जर कोणत्याही शाळेने कॉपीप्रकरणांमध्ये दोषी आढळल्यास, त्या शाळेला परीक्षा केंद्र मान्यता नाकारली जाणार आहे. या माध्यमातून परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणि विश्वास निर्माण केला जात आहे.
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले, राज्यभरातील सर्व शाळा व अंगणवाड्यांचे जिओटॅगिंग करण्यासाठी एमआरसॅक ॲपचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. पीएमश्री शाळेच्या धर्तीवर राज्यात ‘सीएम श्री’ आदर्श शाळा उभारण्यात येणार आहे. तसेच ‘आनंद गुरुकुल’ उपक्रमाअंतर्गत प्रत्येक विभागात एक निवासी शाळा सुरू करून त्यात कला, क्रीडा व एआय (AI) प्रशिक्षणासह स्पेशालिटी शिक्षण दिले जाईल.
शिक्षकांवरील भार कमी, फक्त चार समित्या!
शिक्षकांवरील शिक्षणबाह्य कामाचे ओझे कमी करण्यासाठी, आधीच्या 15 समित्यांचे एकत्रीकरण करून आता फक्त चार समित्या ठेवण्यात आल्या आहेत. तसेच आदर्श शिक्षक व चांगल्या शैक्षणिक संस्थांचा अनुभव इतर शाळांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी हेल्थ कार्ड, मोफत उपचार आणि प्रोत्साहन योजना
शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन लाभ देण्याचा विचार सुरू असून, हेल्थ कार्ड आणि मोफत उपचार योजना देखील लवकरच अंमलात येणार आहेत. CBSE पॅटर्नमधील चांगल्या बाबींचा समावेश करताना, राज्याचा इतिहास, भूगोल यावर कुठलीही तडजोड केली जाणार नाही, हेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
तथापि राज्य शिक्षण मंडळ, बालभारती राज्याचा इतिहास, भूगोल याविषयी कुठेही तडजोड होणार नाही. विद्यार्थ्यांसाठी सर्व उपक्रम राबविताना गुणवत्तापूर्ण आनंददायी व सर्वसमावेशक शिक्षण देण्याच्या दिशेने राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे श्री.भुसे यांनी स्पष्ट केले.
निष्कर्ष
शिक्षणात गुणवत्ता, नवोपक्रम आणि समावेशकता हेच राज्याचे उद्दिष्ट
शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयांनी स्पष्ट होते की, राज्य शासन गुणवत्तापूर्ण, आनंददायी आणि सर्वसमावेशक शिक्षणव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2025 चे प्रभावी अंमलबजावणीतून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचा संकल्प बळकट केला जात आहे.